Home Cities जळगाव भीमजन्मोत्सवानिमित्त वाघ नगरमध्ये व्याख्यान आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन

भीमजन्मोत्सवानिमित्त वाघ नगरमध्ये व्याख्यान आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती’ सज्ज झाली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघ नगरमधील आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात येत असून, संपूर्ण परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून काढण्यात आले आहे. या जय्यत तयारीमुळे संपूर्ण परिसरात आत्तापासूनच चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या जयंती उत्सवाचे स्वरूप केवळ साजरे करण्यापुरते मर्यादित न ठेवता, समितीने सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांची आखणी केली आहे. उत्सवाची सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने होणार आहे. या दिवशी सायंकाळी ७ वाजता प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रीय हिंदू संघटनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी प्राचार्य सुरेश वाघ सर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील आणि श्रीकृष्ण मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक रंगलाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची ही मालिका पुढे चालू ठेवत १२ एप्रिल रोजी लहान मुले आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी रात्री योगेश भालेराव यांचा संगीतमय ऑर्केस्ट्रा सादर होणार असून, याच ठिकाणी मध्यरात्री भीमजन्मोत्सव निमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा केला जाईल. मुख्य जयंतीदिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता संविधान नगर येथून एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विसर्जित होईल. तसेच त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भीमगर्जनांच्या निनादात वाघ नगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज अडकमोल यांनी दिली असून, सर्व समाजबांधवांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound