एसटी महामंडळांकडून तिकिटांच्या किंमतीत वाढ

bas seva

 

मुंबई प्रतिनिधी । दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही 10 टक्के भाडेवाढ केली आहे. येत्या 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात भाडेवाढ केली जाते. याच काळात खाजगी वाहनांचेही भाडे मोठ्या प्रमाणात वाढते. गेली 4 वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 2500 रुपये आणि 5000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

यासंदर्भात एसटीच्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी दिवाकर रावतेंना फोन करुन मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती केली. त्या विनंतीच्या अनुषंगाने दिवाकर रावतेंनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.

Protected Content