यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त होत असून उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमान प्रवास करत असताना झालेल्या भीषण अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आपल्या कार्यशैलीमुळे आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना “कामाचा माणूस” अशी ओळख लाभली होती आणि विविध विकासकामांमुळे ते जनतेच्या मनात घर करून राहिले होते.

उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात आयोजित शोकसभेत स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. सभेत त्यांच्या कार्याचा आढावा घेताना वक्त्यांनी सांगितले की, राज्याच्या विकासात आणि ग्रामीण भागातील योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
या शोकसभेला चेअरमन शशीकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, सरपंच छोटू भगवान भिल, उपसरपंच सौ. भावना शशीकांत पाटील, रत्नाबाई बापूराव पाटील, सौ. किरण पाटील, अरुण सोनवणे, प्रा. विश्वनाथ पाटील, जनार्दन कोळी, विवेक गणपत पाटील, दिलीप यशवंत पाटील, डिगंबर सपकाळे, अशोक महाजन, सचिव संजय महाजन, लक्ष्मीकांत पाटील, जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, अनिल राजधर पाटील, साहेबराव पाटील, दिनकर पाटील, मोहन महाजन, शुक्राम कोळी, प्रा. शिक्षक अनिल पाटील, गणेश कोळी तसेच ग्रामसेवक भरत पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि प्रशासनात वेगळी कार्यपद्धती रुजवली. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.



