
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) सतर्क कारवाईत गुजरात राज्यातील एक अट्टल गुन्हेगार जळगाव जिल्ह्यात अटक करण्यात यश आले आहे. साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटिया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) या धोकादायक गुन्हेगारास भुसावळ शहरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी तापी व्यारा (सेशन कोर्ट, गुजरात) येथील गंभीर गुन्ह्यात फरार होता आणि त्याच्या अटकेसाठी गुजरात पोलिसांना शोध सुरू होता.

गुजरातमधील निझर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर तापी व्यारा कोर्टातील केस क्रमांक ४२/२०२४ अंतर्गत भा.दं.वि कलम ३९४, ३९७, ३४२, ३२३, ५०४(२), ३४, १२०(ब), आर्म अॅक्ट २५(१), जी.पी. अॅक्ट १३५ नुसार जबरी चोरी, शारीरिक मारहाण व कट रचण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपीविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
भुसावळ उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता नहाटा चौफुली परिसरातील महामार्गावर सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्यावर गुजरातमधील उमरा, सचिन, माहीरापुरा, पुना, कडोदरा, नवसारी ग्रामीण अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ प्रकरणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांमध्ये भा.दं.वि कलम ४५७, ३८०, ११४, ३७९ व आर्म अॅक्टचा समावेश आहे.
सदर आरोपीवर २०२२ आणि २०२५ दरम्यान सातत्याने गुन्हे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, त्याचा गुन्हेगारीचा इतिहास अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याच्या अटकेने जळगाव जिल्ह्यात तसेच सीमाभागात अवैध हालचालींना चाप बसण्याची शक्यता आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) चे सफौ/२२५ ए. बी. पटेल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोउनि. शरद बागल, पोउनि. रवी नरवाडे, पोहेकॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना. विकास सातदिवे, पोकों. प्रशांत परदेशी, पोकॉ. राहुल वानखेडे यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
सदर अट्टल गुन्हेगाराच्या अटकेमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात असलेल्या गुन्हेगारी जाळ्याला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वेळेवर आणि अचूक कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्यांना रोखण्यात यश आले आहे.



