जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदे गावात सोमवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शेगाव येथे पायी जाणाऱ्या वारीचे भावपूर्ण आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. एरंडोल येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या या दिंडीचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे.
गावातील भाविकांनी एकत्र येऊन या वारीचे स्वागत केले. वावडदे नगरीतील गौरी उद्योग समूहाच्या वतीने दिंडीचे आगमन झाल्यानंतर पालखीची आरती करण्यात आली. आरतीचा मान रविंद्र कापडणे, प्रकाश पाटील आणि जानकीराम पाटील यांच्या परिवाराला मिळाला.

या वारीचे आयोजन बापू मोरे सर आणि संत गजानन सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी लहु पाटील, सुमित पाटील, आबा गोपाळ, कोमल पवार, विक्रम पवार, प्रमोद पाटील, रतन न्हायदे, गणेश गोपाळ यांच्यासह गावातील असंख्य भक्तगण उपस्थित होते. एरंडोल ते शेगाव या पायी वारीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांसाठी वावडदे येथील नागरिकांनी उत्तम सोय केली. संत गजानन महाराजांच्या जयघोषात संपूर्ण वावडदे नगरी दुमदुमून गेली होती. या वारीमुळे गावात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



