जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने आज जुना खेडी रोडवरील शंकरराव नगर येथे ‘सकल लेवा युवती आणि महिला राज्यस्तरीय अधिवेशना’चे अभूतपूर्व आयोजन करण्यात आले. लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि पुण्यातील समाज भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती.

दिग्गजांच्या हस्ते झाले उद्घाटन :
कार्यक्रमाचे उद्घाटन सावद्याचे भक्ती प्रसाद महाराज यांच्या मंगल उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी, माजी महापौर सीमाताई भोळे, महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले आणि खानदेश सेनेचे प्रमुख सुहास बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, डॉ. शिल्पा बेंडाळे, सिंधुताई कोल्हे, उज्वलाताई बेंडाळे आणि प्रांजली खर्चे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढवले.

कर्तृत्वाचा सन्मान आणि श्रद्धांजली :
कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजातील दिवंगत ज्येष्ठ व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या समाजातील युवती व महिलांना ‘गौरव चिन्ह’ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील कर्तृत्ववान महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता.
रंगला पैठणीचा खेळ :
अधिवेशनाचे खास आकर्षण ठरला तो म्हणजे सुहास बोंडे यांनी पुरस्कृत केलेला ‘पैठणी’चा खेळ. उपस्थितांना कुपन वाटप करून लकी ड्रॉ काढण्यात आला. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून विजेत्या महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी अत्यंत मिश्किल शैलीत या खेळाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुसूत्र संचलन डॉ. सुनील चौधरी आणि ज्योती भोळे यांनी केले. या अधिवेशनामुळे लेवा पाटीदार समाजातील महिला संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



