Home धर्म-समाज श्रीक्षेत्र कोथळीत संत मुक्ताईंची प्रक्षाळ पूजा ; २१ वनौषधींच्या काढ्याने घातला महाअभिषेक

श्रीक्षेत्र कोथळीत संत मुक्ताईंची प्रक्षाळ पूजा ; २१ वनौषधींच्या काढ्याने घातला महाअभिषेक


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती मुक्ताईंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र कोथळी येथे गुरुवारी श्रद्धेचा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या भव्य यात्रोत्सवानंतर, भाविकांच्या अलोट गर्दीमुळे आईसाहेबांना आलेला थकवा दूर करण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे अत्यंत भावपूर्ण वातावरणात ‘प्रक्षाळ पूजा’ संपन्न झाली.

श्रद्धेची आणि उपचाराची अनोखी परंपरा :
दिनांक ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान संत मुक्ताईंचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या काळात लाखो भाविकांनी आईसाहेबांचे दर्शन घेतले आणि मंदिर सलग २४ तास खुले होते. वारकरी संप्रदायातील श्रद्धेनुसार, भाविकांच्या या अखंड दर्शनामुळे आईसाहेबांना मानवी देहाप्रमाणे थकवा येतो. हाच थकवा दूर करण्यासाठी दरवर्षी यात्रोत्सवानंतर प्रक्षाळ पूजा करण्याची प्राचीन परंपरा येथे जोपासली जाते.

साखर-लिंबू आणि वनौषधींचा सात्विक उपचार :
प्रक्षाळ पूजेचे स्वरूप अत्यंत विलोभनीय होते. पहाटे ७ वाजता भाविक आणि सेवेकऱ्यांनी मिळून संपूर्ण मंदिराचा गाभारा स्वच्छ केला. त्यानंतर आईसाहेबांच्या मूर्तीला साखर आणि लिंबू लावून स्वच्छ करण्यात आले. यानंतर २१ प्रकारच्या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेल्या विशेष काढ्याने मूर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात महाअभिषेक करण्यात आला. या सात्विक उपचारानंतर आईसाहेबांची महाआरती करून त्यांना खास पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

मान्यवरांचा गौरव आणि उपस्थिती :
या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.


Protected Content

Play sound