

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरात श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा प्रत्यय देणारा सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा रविवारी, दि. २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील युवकांच्या पुढाकारातून हा सोहळा साजरा होणार असून, समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ, जळगाव यांच्या वतीने दुपारी अडीच वाजता हा पालखी सोहळा कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळून प्रारंभ होणार आहे. सवाद्य मिरवणुकीत संताजी महाराजांच्या पालखीसमवेत पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तिगीते आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
ही मिरवणूक कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौक मार्गे पोलनपेठेतील दत्त मंदिरापर्यंत जाणार असून, मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत व पुष्पवृष्टी केली जाण्याची तयारी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
मिरवणुकीचे आकर्षण ठरणारी महिला व मुलींसाठीची वेशभूषा स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आली असून, उत्कृष्ट वेशभूषा व कलश धारण करणाऱ्या महिला व मुलींना गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमातून पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि महिलांचा सक्रिय सहभाग अधोरेखित होणार आहे.
याबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी सांगितले की, हा पालखी सोहळा यंदा पंधराव्या वर्षात पदार्पण करत असून, संताजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार, समाजात एकोपा आणि युवा पिढीत संस्कार रुजवणे हा यामागील उद्देश आहे. वेळेवर उपस्थित राहून अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



