जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जळगावात युवतींच्या दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) येथे हा अनोखा उत्सव रंगणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव असलेली ही युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून आपली परंपरा जपून आहे, आणि यंदा ती आणखी भव्य दिव्य होणार आहे.
यंदाच्या दहीहंडीत प्रथमच ११ युवतींचे संघ सहभागी होत आहेत, जो एक विक्रम ठरणार आहे. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असून, एकूण ५०० युवती गोविंदांनी या उत्सवासाठी कसून सराव सुरू केला आहे. विशेष म्हणजे, यंदा ५ थरांपर्यंत मानवी मनोरा रचण्याचा सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संघांची तयारी अंतिम टप्प्यात असून, हा थरार अनुभवण्यासाठी जळगावकर उत्सुक आहेत.

पुणेरी ढोल-ताशांचा गजर आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके:
गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब आणि सांस्कृतिक नृत्य आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. या उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी शौर्यवीर, पेशवा आणि वज्रनाद या ढोलपथकांचे तब्बल ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण भारून टाकणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक सहकुटुंब उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या ११ युवती पथकांचा सहभाग:
यंदाच्या दहीहंडी फोडण्यासाठी किडस् गुरूकुल शाळा, नूतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा आणि एन.सी.सी. या पथकांचा समावेश आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात खासदार अॅड. उज्ज्वल निकम, खा. स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. इंद्राणी मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचा समावेश आहे. या भव्य दहीहंडी उत्सवाची जळगावकरांना उत्सुकता लागली आहे



