भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात शुक्रवार, २० मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून समाजसेवेच्या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) तसेच श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळ आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

हे शिबिर नंदनवन कॉलनीतील खाचणे हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहेत. शिबिरात सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धतीने रक्तदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या पवित्र कार्यात जास्तीत जास्त सेवेकरी, युवक-युवती आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळतर्फे करण्यात आले आहे.
शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सुरेश न्हावकर (९४२३९५०९२४) आणि लक्ष्मण पाटील (९३२६१५०००६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी मजबूत होण्यासोबतच आरोग्य सेवेला हातभार लागणार आहे.



