जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नयनतारा रेस्ट हाऊस समोरील रस्त्यावर बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना अज्ञात दोन जणांनी डोळ्यांवर स्प्रे मारून बेदम मारहाण करून गळ्यातील २ लाख १० दहा हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. याबाबत रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहाडी रोड परिसरात खुबचंद प्रेमचंद साहित्या वय ५८ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम व्यावसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खुबचंद साहित्या हे रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. त्यावेळी दोघांपैकी एकाने साहित्या यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्याची आग झाल्याने त्यांना काहीही दिसत नव्हते. त्यानंतर दोन्ही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २ लाख १० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर साहित्या यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे हे करीत आहे.




