Home Cities जळगाव संपादरम्यानही मानवतेचे दर्शन: परिचारिकांकडून रक्तदान शिबिर !

संपादरम्यानही मानवतेचे दर्शन: परिचारिकांकडून रक्तदान शिबिर !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, जिल्हा शाखा जळगाव यांच्या वतीने बुधवारी २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिचारिकांचा राज्यव्यापी संप सुरू असतानाही, शासकीय रुग्णालयातील रक्तसाठा कमी असल्याची गंभीर बाब लक्षात घेता, सामाजिक जबाबदारीचे भान राखत परिचारिका आणि परिचारकांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.

संपाच्या पार्श्वभूमीवरही संघटनेच्या सदस्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे. या शिबिरात संघटनेच्या अध्यक्षा रूपाली पाटील, सचिव राजेश्वरी कोळी, कार्याध्यक्ष नीता दुसाने, खजिनदार अक्षय सपकाळे यांच्यासह अनेक परिचारक आणि परिचारिकांनी स्वखुशीने रक्तदान केले.

या उपक्रमातून संपात सहभागी असूनही रुग्णसेवा थांबवायची नाही, आणि संकटसमयी एक पाऊल पुढे टाकायचे हा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. “रक्तपेढीतील तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत,” असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

या सामाजिक उपक्रमामुळे परिचारिका संघटनेच्या जबाबदारीची जाणीव जनतेसमोर आली असून, या कृतीमुळे रुग्णांना वेळेत रक्त मिळण्यास मोठी मदत होणार आहे. संपासारख्या कठीण काळातही मानवतेचा हात पुढे करणाऱ्या या परिचारकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीने समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound