Home प्रशासन नगरपालिका महिलांच्या आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी देणार – नगराध्यक्ष गायत्री भंगाळे

महिलांच्या आरोग्य सुविधांसाठी ५० लाखांचा निधी देणार – नगराध्यक्ष गायत्री भंगाळे


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपालिकेत विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांसह महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील कष्टकरी आणि कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी खर्चून अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी यावेळी केली.

भुसावळ नगरपरिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील उपेक्षित आणि कष्टकरी अशा सुमारे तीनशे महिलांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक महिलांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानित महिलांमध्ये जयश्री काळवीट, चारूलता भालेराव, ॲड. भंडारी यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला नाट्य अभिनेत्री मंजुषा भिडे, डॉ. श्रद्धा चांडक, ललिता चौधरी, सायली चौधरी, नगरसेविका पुष्पा चौधरी, नसीम बी शेख नदीन आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. श्रद्धा चांडक यांनी ‘आरोग्यावर बोलू काही’ या विषयावर महिलांना मार्गदर्शन करत आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सांस्कृतिक वारसा बोधचिन्ह’ या प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले. जागतिक मराठी भाषा सप्ताह आणि महिला दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला. महिला साहित्यिक सीमा भारंबे यांच्या घरासमोर त्यांच्या नावाची मराठमोळी पाटी लावून या अभिनव प्रकल्पाची राज्यात प्रथमच सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनूप खोब्रागडे, गणेश चौधरी आणि नरेंद्र भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. श्रद्धा चांडक, मंजुषा भिडे, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, राशी पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound