यावल प्रतिनिधी । आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून यावल तालुक्यातील गावांना पेव्हर ब्लॉक रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी पावणे तीन कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते तर माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष सहकार्यातून हे कार्य होत आहे. आ. लताताई सोनवणे व मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी या विधानसभा क्षेत्रांमध्ये “गाव तिथे विकास काम “ही अंगिकारले असून दहीगाव ते विरावली फाटा पाच किलोमीटर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व विरावली गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे या कामासाठी १ कोटी ८o लक्ष रुपये मंजूर केले आहे. तर सावखेडा सिम, मोहराळा, विरा वली, महेलखेडी या गावांसाठी २५ लक्ष रुपये तसेच विरावली गावात लहान पुलाचे काम ५० लक्ष ग्रामपंचायत कार्यालय बांधणीसाठी २० लक्ष असे पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या प्रसंगी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व दहिगाव, विरावली, महेलखेडी, मोहराळा गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थिती द्यावी आणि कोराणाचे नियम पाळावेत असे आवाहन शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे यांच्यासह आदींनी केले आहे.