धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घर फोडून रोख १ लाख ६५ हजारांची रोकड आणि एका शेतकऱ्याच्या ७ हजार रूपये किंमतीच्या कोंबड्या चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यात अनिल विश्वास माळी (वय-४८) रा. बांभोरी हे भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते १४ ऑक्टोबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ५० हजरांची रोड लांबविली. तर त्याच परिसरात राहणारे धिरज बाबुलाल पाटील यांच्या घराच्या खिडकीचे आराऱ्या तोडून घरातून १५ हजारांची रोकड लांबविली आणि गावात राहणारे सुरेश रोहिदास पाटील यांच्या शेतात शेडमध्ये असलेल्या ७ हजार रूपये किंमतीच्या १० गावराण कोंबड्या चोरून नेल्याचे समोर आले.
चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळमुळे बांभोरी गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी अनिल विश्वास माळी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.