पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे माहितीचा अधिकार अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भागवत बंडू पाटील (वय ४५) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मंदिराजवळ घडली. फिर्यादी पाटील मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येत असताना, आरोपी अमोल बाविस्कर आणि त्याच्या इतर आठ साथीदारांनी त्यांना अडवले. “तू माहितीचा अधिकार मागे घे, आमचे ऐकले नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांना शिवीगाळ सुरू केली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी पाटील यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अमोल बाविस्कर, दादाराव बाविस्कर, रमेश बाविस्कर यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहे.



