यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील शिरागड-कोळन्हावी दरम्यान असलेल्या मानकी-भोनक नदीवर बंधारा-कम-पुल उभारण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना जळगाव दौऱ्यादरम्यान भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी निवेदन सादर केले.
शिरागड येथे सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. परंतु कोळन्हावी गावातून शिरागडला जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तापी नदीची उपनदी असलेल्या मानकी-भोनक नदीवर बंधारा-कम-पुल झाल्यास सिंचन व दळणवळणाच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
विशेषतः चैत्र आणि आश्विन नवरात्रीत मोठ्या प्रमाणावर भाविक शिरागडला येतात. मात्र, जळगाव आणि चोपडाकडून येणाऱ्या भाविकांना कोळन्हावीपर्यंत वाहनाने येऊन उर्वरित अंतर पायी पार करावे लागते. तसेच, तापी नदी जवळ असूनही यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील पाणीपातळी कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर बंधारा उभारला गेला, तर पश्चिम भागातील शेतीला पाणीपुरवठा होऊन तो सुजलाम-सुफलाम बनेल. या मागणीच्या अनुषंगाने तांत्रिक सर्वेक्षण लवकर व्हावे आणि बंधारा उभारला जावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. संबंधित प्रस्तावासह नकाशा देखील सादर करण्यात आला. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी निवेदन स्वीकारले आणि लवकरच तांत्रिक सर्वेक्षणाची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
सदर निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत सोनवणे (चोपडा), आमदार अमोल जावळे (यावल-रावेर) यांनाही पाठवण्यात आल्या. या भेटीदरम्यान अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अंकुश महाराज पाटील मनवेलकर उपस्थित होते. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन, आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून घेण्यात आली, अशी माहिती डॉ. सुनिल पाटील यांनी दिली.