बुलढाणा, खामगाव प्रतिनिधी । आजपासून सर्वत्र ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील खामगाव शहराचे आराध्य दैवत घाटपुरी देवी (माँ जगदंबा) मातेचे दर्शन घेण्यासाठी पाहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.
खामगाव पासूनच जवळ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर वसलेले घाटपुरी गावात सुमारे १५० वर्षापूर्वी गावातील जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु असताना जगदंबा देवीची मूर्ती सापडली होती. यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली असून नियमित पुजापाठास सुरु झाली. याठिकाणी भक्तांनी केलेले नवस हे पुर्ण होत असल्यामुळे जगदंबा मातेचा महिमा दुरवर पसरु लागला. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षापूर्वी देवी संस्थानच्या वतीने मंदिर परीसरात वेद-शाळा सुरु करण्यात आली आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात हे मंदिर २४ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात येते असून पुणे, मुंबई, अहमदाबाद यांसह जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सकाळी ४ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. आज सकाळी 9 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून घाटपुरी परिसरात आदिशक्तीचा गजर करण्यात येणार आहे. या नऊ दिवसांमध्ये भक्तीमय वातावरण पसरले असते. भाविक आपले मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस देण्यासाठी येत असतात.