जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर कडक कारवाई करत असतानाच, तडीपारीचा आदेश धाब्यावर बसवून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (वय २४, रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमन उर्फ खेकडा हा जळगाव पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला २० ऑगस्ट २०२५ रोजी १८ महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत तो कोणतीही परवानगी न घेता शहरात वावरत होता. ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, तडीपार असलेला अमन हा परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एमआयडीसीतील ‘एच’ सेक्टरमधील पुष्पा पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी रमाकांत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमन उर्फ खेकडा याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या उल्लंघनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे हे करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे तडीपार गुंडांना अटक झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



