Home धर्म-समाज शेगावात श्रद्धा, सेवा आणि अन्नदानाचा संगम; एक लाख मोदकांचा प्रसाद वाटप

शेगावात श्रद्धा, सेवा आणि अन्नदानाचा संगम; एक लाख मोदकांचा प्रसाद वाटप


शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेगावात आज संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. यावर्षी पुण्यतिथीचा सोहळा आणि ऋषीपंचमीचा दिवस एकाच वेळी आल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. देशभरातून आलेल्या लाखो भाविकांमुळे शेगाव नगरी भक्तिमय झाली आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून नागपूरच्या संत श्री सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात येणारा अन्नदानाचा उपक्रम.

एक लाख मोदकांचा महाप्रसाद
नागपूरच्या या सेवा समितीने यावर्षी तब्बल ४० हजार भाविकांना मोफत प्रसाद वाटप करण्याचा संकल्प केला आहे. या प्रसादाची सर्वात मोठी खासियत म्हणजे, यात तब्बल एक लाख मोदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व मोदक हाताने तयार करण्यात आले आहेत. केवळ दोन दिवसांत ५० क्विंटल मोदक तयार करण्यात आले. याव्यतिरिक्त, चुलीवर तयार केलेल्या पोळ्या, भाजी आणि भाताचाही प्रसादामध्ये समावेश आहे. एकूण ७० ते ८० क्विंटल अन्नपदार्थ या महाप्रसादासाठी तयार करण्यात आले आहेत.

सेवेचा आणि अन्नदानाचा अद्भुत संगम
या अन्नदानाच्या महायज्ञात शेकडो स्वयंसेवक दिवस-रात्र निस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हा भव्य भंडारा यशस्वी होत आहे. भाविकांना भक्तीभाव, निस्वार्थ सेवा आणि अन्नदानाचा अद्भुत संगम अनुभवता येत आहे. नागपूरच्या या सेवा समितीचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचे आणि सेवेचे दर्शन घडवत आहे. संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा सेवाभावी उपक्रम भाविकांना नक्कीच समाधान देणारा ठरत आहे. दरवर्षी भाविक या उपक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात.


Protected Content

Play sound