Home Cities बुलढाणा वीज ग्राहकांच्या सेवेत ‘चलता है’ संस्कृतीला पूर्णविराम : परेश भागवत यांचा स्पष्ट...

वीज ग्राहकांच्या सेवेत ‘चलता है’ संस्कृतीला पूर्णविराम : परेश भागवत यांचा स्पष्ट इशारा


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरणमध्ये काम करताना ‘चलता है’ संस्कृतीला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, असा ठाम इशारा प्रादेशिक संचालक नागपूर तथा कार्यकारी संचालक मुंबई परेश भागवत यांनी दिला आहे. वितरणातील हानी कमी करणे, कायमस्वरूपी वीज खंडित असलेल्या ग्राहकांची चौकशी, फिडर इंडेक्सिंगनुसार बिलिंग, १००% वीजबिल वसुली आणि ग्राहकांना वेळेवर बिल भरण्याची सवय लावणे ही उद्दिष्टे महावितरणपुढे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्युत भवन येथे झालेल्या अकोला परिमंडळाच्या आढावा बैठकीत भागवत बोलत होते. ही त्यांची अकोला परिमंडळाच्या पालकत्वाच्या जबाबदारीनंतरची पहिली बैठक होती. या बैठकीस मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलडाणा), अजश शिंदे (वाशिम), अजितपालसिंह दिनोरे (अकोला), विभागीय कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, व्यवस्थापक (वित्त व लेखा) उपस्थित होते.

भागवत यांनी अधोरेखित केले की, वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे आणि अखंड व दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. त्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे नियमित करणे गरजेचे आहे. तसेच, कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास त्यासाठी प्रशासन मदतीस तत्पर आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालयात तत्परतेचा अभाव जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सौरऊर्जा आधारित योजनांची अंमलबजावणी करताना अडथळे येऊ नयेत यासाठी त्यांनी रूफटॉप सोलर योजनेतील मीटर बसवण्याचे काम गतीने करण्यास सांगितले. सौरकृषी पंप योजनेत शेतकऱ्यांचा वाढता कल पाहता, सर्व्हेसाठी डेडिकेटेड लाईनमनची नियुक्ती तसेच तांत्रिक प्रक्रियांचा जलद निपटारा व्हावा, असे निर्देश त्यांनी दिले.

टिवोडी मीटर संदर्भात बोलताना भागवत म्हणाले की, एएमआयएसपीमार्फत बसवण्यात आलेले मीटर वेळेत रिप्लेस करावेत. यामुळे ग्राहकांना फॉल्टी स्टेटसने सरासरी बिल टाळता येईल आणि बिलींग प्रक्रियेबाबत स्पष्टता राहील. टिवोडी मीटरचे फायदे, युनिट सवलत आणि अचूक बिलींगबाबत जनजागृती करण्याचेही त्यांनी सूचित केले.

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, आरडीएसएस योजनेचा त्यांनी एजन्सीनिहाय आढावा घेतला. तीनही जिल्ह्यातील वीजबिल वसुली, कायमस्वरूपी खंडित वीज पुरवठा, देखभाल दुरुस्ती, नवीन जोडणी आदी विषयांवर उपविभागनिहाय आढावा घेतला आणि कार्य पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

या बैठकीत मानोरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. गीरी यांचा विशेष उल्लेख झाला. दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यांच्या जिद्दीचे व कार्यक्षमतेचे कौतुक करत प्रादेशिक संचालक भागवत यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. त्यांनी अभियंत्यांना ग्राहकाभिमुख दृष्टिकोन बाळगण्याचा आणि तक्रारींवर नव्हे तर उपायांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही दिला.


Protected Content

Play sound