जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील धांडे नगरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी 24 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र राधाकिशन कलंत्री वय-65, रा. धांडे नगर, जळगाव हे वृद्ध आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. दरम्यान 29 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी 24 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.