Home धर्म-समाज गणेश मंडळांसाठी दिलासादायक निर्णय ; आता घरगुती दराने मिळणार वीज, अनामतही लगेच...

गणेश मंडळांसाठी दिलासादायक निर्णय ; आता घरगुती दराने मिळणार वीज, अनामतही लगेच परत!


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. महावितरणने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे यंदाचा उत्सव अधिक प्रकाशमय आणि सुरक्षित होणार आहे. आता सार्वजनिक गणेश मंडळांनाही घरगुती दराने वीजपुरवठा मिळणार असून, तात्पुरत्या स्वरूपात त्वरित वीजजोडणीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मंडळांच्या आर्थिक भारात मोठी कपात होणार असून, वीजसुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी घरगुती दराने मिळणाऱ्या वीजपुरवठ्याचा लाभ घ्यावा. त्यासाठी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली पाहिजे आणि वीजसंच मांडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह महावितरण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. या कागदपत्रांमध्ये नोंदणी प्रमाणपत्र, मंडप परवानगी, पोलीस परवाना, विद्युत संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व बँक खात्याची छायांकित प्रत आवश्यक आहे.

गणेशोत्सव काळात मंडप आणि देखावे उभारणीदरम्यान लघुदाब व उच्चदाब विद्युत यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक आहे. वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेणे, विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधण्यासाठी महावितरणच्या स्थानिक नियंत्रण कक्षाचे मोबाईल क्रमांकही २४ तास उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यासाठी ७८७५७६३४८५ आणि अकोल्यासाठी ७८७५७६३३३९ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरावी लागेल. ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरल्यास गणेशोत्सवानंतर वीजबिल वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी ही रक्कम ऑनलाइन भरण्यावर भर द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असलेल्या मंडळांना आर्थिक आणि व्यवस्थापकीय पातळीवर मोठा दिलासा मिळणार आहे. सुरक्षितता, सुविधा आणि सुलभता या तिन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपक्रम असल्याचे मंडळांकडून स्वागत केले जात आहे.


Protected Content

Play sound