मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरीही शहरात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नगराध्यक्ष नजमा तडवी यांचा कार्यकाळ संपत आला असून, त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी विविध राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परिणामी, नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी चुरस निर्माण झाली असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारांची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील हे लवकरच घोषणा करणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्या पत्नी सौ. पूनम कोलते यांचे नाव आघाडीवर असून, त्यांचा स्थानिक भागातील कार्यकर्त्यांवर चांगला प्रभाव असल्याचे सांगितले जाते. कोलते कुटुंबाचा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग यामध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाची पार्श्वभूमी ठरू शकतो.

भाजपकडून माजी सरपंच ललित महाजन यांच्या पत्नी सौ. भावना महाजन यांचे नाव पुढे आले असून, महाजन कुटुंबाचे ग्रामीण भागातील वर्चस्व आणि संघटन कौशल्य त्यांना फायद्याचे ठरू शकते. भाजपकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच त्यांचे नाव चर्चेत आल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.
काँग्रेसकडून ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. अरविंद गोसावी यांच्या पत्नी सौ. रेखा गोसावी यांचे नाव चर्चेत आहे. गोसावी दाम्पत्याचे शहरात चांगले सामाजिक आणि राजकीय नेटवर्क असून, काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता आहे.
याशिवाय, अपक्ष म्हणून स्थानिक उद्योजक विनोद सोनवणे (योगराज कन्स्ट्रक्शन) यांनीही नगराध्यक्ष पदासाठी तयारी दर्शवली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे प्रस्थापित पक्षांच्या गणितात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सोनवणे यांचा आर्थिक आणि सामाजिक पाठिंबा लक्षात घेता, ते निवडणुकीतील महत्त्वाचे ‘किंगमेकर’ ठरू शकतात.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार होणार असून, कोणता पक्ष किंवा अपक्ष बाजी मारतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर उमेदवार निश्चित होणार असले तरी सध्याचे राजकीय चित्र ‘बहुरंगी’ आणि चुरशीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.



