बीड (वृत्तसंस्था) भाजप नेते सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कथित व्हिडिओ क्लिपचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चात भाषण करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून धनंजय मुंडे यांचं कथित वक्तव्य असलेल्या या व्हिडिओचा निषेध करण्यासाठी सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांनी आज आष्टीमध्ये मूक मोर्चा काढला होता. शनिवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही धस आणि धोंडे यांनी आष्टीत प्रचंड मोर्चा काढून धस यांनी भाषणही केले. धनंजय मुंडेंचा निषेध करायचा असेल तर भाजपला मतदान करून त्याचा निषेध नोंदवा, असे आवाहन धस यांनी मोर्चेकऱ्यांना केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर दोघांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.