पाचोरा प्रतिनिधी । कुर्हाड खु तालुक्यातील पाचोरा येथील २५ वर्षीय सीआयएसएफ जवानाने ओरिसा येथील चिलकास सरोवर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही आहे.
मयत जवानाची पत्नीस सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर जवान गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आरडाओरड करत तिने शेजारच्या नागरीकांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र आत्महतेचे खरे कारण समजू शकले नाही. सी. आय. एस. एफ. जवानाचा मृतदेह शनिवारी औरंगाबाद येथे विमानाने आणल्या नंतर सायंकाळी कुऱ्हाड खु” येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घटनास्थळी शासनाचे प्रतिनिधी तहसिलदार कैलास चावडे, तलाठी भरत परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांनी भेट दिली.
मुळचे लासगाव ता. पाचोरा येथील रहिवासी असलेल्या गोपाल अरुण सुर्यवंशी (सुतार) यांचे वडील अरुण सुर्यवंशी यांनी गोपाल हा पाच वर्षाचा असतांना लासगांव येथे गळफास घेऊन आमहत्या केली होती. त्यांची घरची परिस्थिती हालाकिची असल्याने विधवा आई, एक मुलगी व दोन मुलांसह कुऱ्हाड खु” येथे त्यांचा भाऊ नारायण चिंधू मिस्तरी यांचेकडे राहत होते. भावाचीही परीस्थिती बेताची असल्याने आईने मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण केले. गोपाल हा लहानपणापासून मेहनती व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने मामांसोबत मिस्तरी काम करत त्याचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची व आई, लहान भाऊ, बहिण यांचे पालन पोषण करायचे असल्याने शिक्षणा सोबत दररोज व्यायाम व रनिंग करीत असे, अखेर जून – २०१६ मधे त्याने सी. आय. एस. एफ. मधे भर्ती होऊन देशसेवा सुरू केली. सैन्यात गोपाल हा कारपेंटरचे काम करत असे, गोपाळचा विवाह त्याच्या मामाची मुलगी पल्लवी हिच्याशी झाल्यानंतर त्यांना एक वर्षाचा मुलगा असून त्याचा दिनांक २८ जुलै २०२१ रोजी कुऱ्हाड खु” येथे पहिला वाढदिवस साजरा करून तो पत्नी व मुलासह त्याच दिवशी रात्री ओरीसा येथे निघून गेले होते. दरम्यान गोपाल सुर्यवंशी हा आपल्या परीवारासह एक महिना सुटीवर आले होते. सुटी संपल्या नंतर ते दि. २८ रोजी परत गेले होते.
गोपाल सुर्यवंशी च्या निधनानंतर तहसिलदार कैलास चावडे यांनी कुऱ्हाड खु” येथे भेट देवून जवानाची आई, लहान भाऊ, बहिण व मामांचे सत्वन करुन ओरीसा येथे त्यांच्या कमांडरशी भ्रमणध्वनी द्वारे घटनेबाबत माहिती जाणून घेतली, कंमांडरच्या म्हणण्यानुसार गोपाळचा मृतदेह शनिवारी सायंकाळी गावी आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गोपाल हा अतिशय कष्टाळू, मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्याचे निधनाने कुऱ्हाड खु” व लासगाव येथे शोककळा पसरली आहे.