न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; हातात तलवारीच्या जागी संविधान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चित्रपटात डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती तुम्ही पाहिली असेलच. पण, आता नव्या न्यायदेवतेची मूर्ती समोर आली आहे. या न्यायमूर्तीचे डोळे उघडण्यात आले आहेत. इतकेच नाही तर तलवारीऐवजी न्याय देवतेच्या हातात संविधान आहे. भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीश कालीन न्यायव्यवस्था मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केल्याचे यातून नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही. तर, न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे. देशात कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला आहे.

वास्तविक, हे सर्व प्रयत्न सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केले आहेत. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये असाच पुतळा बसवण्यात आला आहे. पूर्वी न्यायदेवतेच्या मूर्तीचे डोळे काळ्या रंगाच्या पट्टीने बांधले होते. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात शिक्षेचे प्रतीक असलेली तलवार होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते, कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे. तसेच, देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान हवे. जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसऱ्या हातातील तराजू हा प्रत्येकाला समान न्याय देत असल्याचे प्रतिक आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या मूर्तीचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय, मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टीही उतरवण्यात आली आहे. मूर्तीच्या डाव्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे. उजव्या हाताला पूर्वीप्रमाणेच तराजू आहे.

Protected Content