नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच ही जनगणना झाली तर याचा देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल आणि त्यांना केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असेही ते म्हणाले. आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. आता आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी. ती केली तर ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल. नुसतीच लोकसंख्या समजणार नाही तर ओबीसींची परिस्थितीदेखील आपल्याला समजेल. त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, जो आता केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळतोय तो ओबीसींना देखील मिळू शकेल. परंतु, त्यासाठी जनगणना व्हायला हवी अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
जाती जनगणना केवळ राज्यपातळीवर करून फायदा होणार नाही. तर ती देशपातळीवर करावी लागेल. केवळ राज्याच्या पातळीवर ही जनगणना झाली तर आपल्याला फक्त माहिती मिळेल. परंतु, केंद्राचा निधी मिळणार नाही. त्यामुळे केंद्राकडून निधी कशाप्रकारे मिळवता येईल याबाबत आज समता परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकारने जाती जनगणना करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा आम्हाला आनंद होईल, त्यामुळे प्रत्येक समाजाची योग्य संख्या समजणं सोपं जाईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.