चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| स्टेशन रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ दोन जणांचे लक्ष विचलीत करून जवळील १ लाख २१ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान काशीनाथ मोरे वय ४३ रा. बहाळ ता.चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २ मार्च रोजी भगवान मोरे हे कामानिमित्त चाळीसगाव शहरात आलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चाळीसगाव स्टेशन रेाडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ असतांना त्यांच्याजवळ कपडी पिशवीत ठेवलेले ८० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. त्याचवेळी त्याच परिसरात शेनफडू आनंदा बागुल रा. चाळीसगाव यांच्याजवळील ४१ हजार रूपयांची रोकड देखील लांबविली. एकच वेळी दोन घटनेत एकुण १ लाख २१ हजार रूपये चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.