जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बौद्ध वसाहत, पिंप्राळा हुडको येथे दोन गटांतील महिलांमध्ये वाद सुरू असताना त्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सदर प्रकारात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडण्यात आली असून, एका कर्मचाऱ्याला चावा घेतल्याने दुखापत झाली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आठ महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिसांना जमिनीवर पाडून मारहाण
महिला पोलीस कर्मचारी स्वाती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:४५ वाजता पिंप्राळा हुडको येथे घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यावेळी बौद्ध वसाहतीतील गाडे चौकात काही महिलांमध्ये हाणामारी सुरू होती. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, वाद करणाऱ्या महिलांनी पोलिसांवरच हल्ला केला. स्वाती पाटील आणि त्यांची सहकारी शिला नागुंडे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिला नागुंडे यांना छातीवर चावा घेऊन दुखापत केली गेली. याशिवाय, हल्लेखोर महिलांनी पोलिसांच्या गणवेशाची कॉलर ओढून फाडली आणि त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
आठ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता हल्लेखोरांची नावे समोर आली. लक्ष्मी अनिल हरताळे, ललिता निळकंठ शिरसाठ, उज्वला रमेश शिरसाठ, कोमल निळकंठ शिरसाठ, सेवाकाई वाघ, आक्का सुरवाडे, पूजा (पूर्ण नाव अज्ञात) आणि आणखी एक अनोळखी महिला अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहाण करणे, चोरी, शिवीगाळ आणि धमकी यासंबंधी विविध कलमांतर्गत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.