आकाशवाणी चौकातील अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली होती.

प्रकरणी सायंकाळी ५ वाजता ट्रक चालक बंटी रामबाण सिंग वय-३२ रा. दौलपूर राज्य राजस्थान याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रऊफ अब्दुल्ला बेलदार वय-६९, रा. मास्टर कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

राऊफ अब्दुल्ला बेलदार हे गुरुवारी 25 जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५२) ने महाबळ करून जळगाव शहरात जात असताना आकाशवाणी चौकात त्यांना ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, खाजगी वाहनातून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. याप्रकरणी मुस्तकीम शेख सलीम वय -३१, रा. मास्टर कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक बंटी रामबाण सिंग वय-३२ रा. दौलपूर राज्य राजस्थान यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे करीत आहे.

Protected Content