जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव खुर्द गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ॲपे रिक्षाचालकाने अचानक ब्रेक मारल्याने रिक्षा पलटी होऊन एका प्रवाशाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत आनंदा डोके वय-४२, रा. लक्ष्मी नगर, भुसावळ असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत डोके हे १८ ऑगस्ट रोजी ते कामाच्यानिमित्ताने जळगाव शहरात आलेले होते. काम आटोपून सायंकाळी ॲपेरिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू १६२८)ने जळगावकडून भुसावळला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिक्षा ही जळगाव खुर्द गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना रिक्षा चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे रिक्षा पलटी झाली, या अपघातात यशवंत डोके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर इतर प्रवासी जखमी झाले होते. या घटनेबाबत अखेर यशवंत डोके यांची पत्नी कल्पना डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात रिक्षा चालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.