जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके ते वावडदा रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पायी जाणाऱ्या महिलेसह दुचाकीस्वाराला धडक देवून कार रस्त्याच्या कडेला उलटी होवून चालक जखमी झाल्याची घटना रविवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी सोमवारी १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता कारचालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरामण पदम राठोड (वय -२७, रा. रामदेव वाडी ता.जळगाव) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वावडदा गावाजवळ रविवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या सोनबाई भिका राजपूत (रा. वावडदा) या महिलेला त्या कार क्रमांक एमएच १५ सीडी ८१९४ ने जोरदार धडक दिली. यावेळी ती महिला चेंडू सारखी उधळून रस्त्यावर आदळली गेल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी कारचा पाठलाग केल्यानंतर जळके ते वावडदा रस्त्याने हिरामण पदम राठोड वय २७ रा. रामदेववाडी ता.जळगाव हे त्यांच्या दुचाकीने जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक ने हिरामण राठोड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हिरामण राठोड हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला उलटी झाल्याने कारचालक कृष्णा नरेंद्र पिंगळे रा. रायसोनी नगर,जळगाव हा देखील जखमी झाला. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी दुचाकीस्वार हिरामण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता कारचालक कृष्णा नरेंद्र पिंगळे यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.