Home Cities जळगाव ‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी लोकसहभागाची हाक; स्थापना दिनी माजी महापौरांचा सन्मान

‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी लोकसहभागाची हाक; स्थापना दिनी माजी महापौरांचा सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त ‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेला चालना देत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून प्रथमच माजी महापौरांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला, तसेच स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, उपायुक्त धनश्री शिंदे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि नगरसचिव सतीश शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात महानगरपालिकेच्या प्रथम महापौर आशाताई कोल्हे यांच्यासह माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा आणि भारती सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासनाच्या वतीने विद्यमान महापौर दीपमाला काळे यांचाही गौरव करण्यात आला.

परिसंवादादरम्यान बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. इंदौरच्या धर्तीवर शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्रमवारीत जळगावचा समावेश व्हावा यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या परिसंवादात विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे, हॉकर्सना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, कचरा वेचणाऱ्या महिलांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून मान्यता देणे, तसेच ‘बेस्ट वॉर्ड’ स्पर्धा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय गोलाणी मार्केट परिसरातील अस्वच्छता, उघड्या गटारी आणि घंटागाड्यांमधून पडणाऱ्या कचऱ्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही नागरिकांनी केल्या.

महापौरांनी या सर्व सूचनांची दखल घेत भविष्यात लोकसहभागातून स्वच्छ जळगाव उभारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव सतीश शुक्ला यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. शुचिता हाडा यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound