रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रावेर तालुक्यातील खिरवड येथे घडली आहे. अंगावर थुंकल्याच्या आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी काठ्यांनी एकाला व त्यांच्या आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव चुडामण कोंढे (वय ५८, रा. खिरवड रा. रावेर) हे आपल्या घरासमोर असताना, आरोपींनी त्यांच्याकडे पाहून थुंकल्याने आणि शिवीगाळ केल्याने वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपी राजू पंडित कोंढे, विजय पंडित कोंढे, उषा पंडित कोंढे आणि पंडित काशीराम कोंढे (सर्व राहणार खिरवड) यांनी संगनमत करून हातात लाकडी काठ्या आणि मोगरी घेऊन राजीव यांच्या अंगणात प्रवेश करत राजीव यांच्या डोक्यात आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजीव यांची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. वृद्ध मातेला लाकडी मोगरीने आणि चापटबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच “तुला पाहून घेईन” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर राजीव कोंढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी राजू पंडित कोंढे, विजय पंडित कोंढे, उषा पंडित कोंढे आणि पंडित काशीराम कोंढे (सर्व राहणार खिरवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



