जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोळासण निमित्त बैलांसाठी गोंडे आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन गोपाल सुर्यवंशी वय १६ रा. वसंतवाडी ता.जळगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सुर्यवंशी हा मुलगा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. सध्या तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात. पोळा निमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होते. त्यामुळे पवन सुर्यवंशी हा बैलांसाठी कासरा व गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकीने वावडदा येथे गेले. बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर सकाळी १० वाजता परत येत असतांना वाडवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेवून पसार झाला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह मित्रपरिवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रूपाला, वडील गोपाल त्र्यंबक सुर्यवंशी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे.