मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने महायुतीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या जागा वाटपात पक्षाला चर्चेत सहभागी करून घेतले नाही, एकही जागा अद्याप दिलेली नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये असा निर्णय झाला असून याची कल्पना पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पक्षाचे महाराष्ट्र पदाधिकारी बाळासाहेब जानराव, सरचिटणीस अॅड. मंदार जोशी, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर तसेच अशोक कांबळे, संजय सोनवणे, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, विरेन साठे यावेळी उपस्थित होते. जानराव यांनी सांगितले की सन २०१४ पासून आरपीआय भाजपबरोबर आहे. आता महायुतीमध्येही आहे. लोकसभेला आम्ही जागा मागितली, तर एकही जागा दिली नाही.
आता विधानसभेला पक्षाध्यक्ष रामदास आठवले १२ जागा मागत होते. त्यांना साधे चर्चेतसुद्धा सहभागी करून घेतलेले नाही, जागा वाटपाचा शब्दही भाजप किंवा महायुतीतील अन्य घटक पक्ष काढायला तयार नाहीत. या सगळ्याचा रोष पक्षात आहे. फक्त आठवले यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले व पक्षाला अन्य काही नाही दिले तरी चालते असा युतीचा समज झाला आहे. हा समज आम्ही काढून टाकू. युतीच्या एकाही उमेदवाराच्या प्रचारात आरपीआयचा कार्यकर्ता सहभागी होणार नाही. आठवले यांना याची माहिती दिली आहे. २६ ऑक्टोबर ही मुदत आम्ही दिली आहे. तोपर्यंत आमची दखल घेतली नाही तर मंत्री आठवले त्यादिवशी त्यांचा अंतीम निर्णय जाहीर करतील अशी माहिती जानराव यांनी दिली. डॉ. धेंडे, अॅड. जोशी यांनी सांगितले की पक्षाची ही एकप्रकारे फसवणूकच सुरू आहे. कार्यकर्ते ती सहन करणार नाहीत. आरपीआयची प्रत्येक मतदारसंघात मोठी निर्णायक मतपेढी आहे. ती बाजूला राहिल्यास काय होऊ शकते याचा धडा युतीला बरोबर मिळेल.