जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. केतकीताई पाटील या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतांना आज खुद्द डॉ. उल्हासदादा पाटील यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा करतांनाच आपण देखील काही तरी ठाम निर्णय घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. उल्हासदादा पाटील यांची कन्या डॉ. केतकीताई पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढणार हे आधी निश्चित नव्हते. तथापि, त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे दिसून आले होते. लवकरच्या त्या भाजप जॉईन करणार असल्याची चर्चा होती. मात्र याबाबत त्यांनी वा डॉ. उल्हासदादांनी या संदर्भात कोणतेही भाष्य केले नव्हते. आज दुपारी मात्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती डॉ. वर्षाताई पाटील आणि युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सहा वर्षांसाठी निलंबीत केले. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यानंतर सायंकाळी डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
डॉ. उल्हासदादा पाटील म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुपारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही कारवाई एकतर्फी, अन्यायकारक आणि न्यायाच्या नैसर्गिक नियमाच्या विरूध्द असल्याची माझी भावना आहे. या संदर्भात आमचे म्हणणे ऐकून न घेतांना एकतर्फी निर्णय घेण्यात आला. आम्ही कॉंग्रेस पक्षासाठी खूप काही केले. अगदी अधिवेशनासाठी आम्ही अनेकदा ट्रेन बुक केल्या. मेळाव्यांसाठी सर्वतोपरी मदत केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही.
डॉ. उल्हासदादा पाटील पुढे म्हणाले की, माझी मुलगी डॉ. केतकी पाटील यांना नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे विचार आवडतात. मोदीजींच्या नेतृत्वात देशाने केलेली प्रगती ही समोर असल्याने त्यांना विचार तिला भावतो. यामुळे ती लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. आता आम्हाला देखील कॉंग्रेस पक्षाने निलंबीत केल्यामुळे आम्ही देखील काही तरी निश्चीत निर्णय घेणार असून तो एक-दोन दिवसात जाहीर करणार असे डॉ. पाटील याप्रसंगी म्हणाले.
आज दुपारी आपण रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय आनंदाने साजरा करून आल्यानंतर आम्हाला कॉंग्रेसमधून निलंबीत करण्यात आल्याची आनंदाची बातमी मिळाली. यामुळे आता खरोखर आनंद झाल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. तर देवेंद्र मराठे व डॉ. वर्षाताई पाटील यांनी देखील पक्षाची कारवाई ही अन्यायकारक असल्याचे याप्रसंगी सांगितले.
खालील व्हिडीओत पहा डॉ. उल्हासदादा पाटील यांची पत्रकार परिषद
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2352409841816291