जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुसरे अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलन, अंबाजोगाई येथे एक व दोन फेब्रुवारी २०२५ शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजित केले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम मराठी व उर्दू गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन स्वागत समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली अशी माहिती दुसऱ्या अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलनाचे स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी मराठी व उर्दू भाषेत गझल लिहिल्या असून त्यांची “शब्द झाले सप्तरंगी”, “उडवाच मान माझी” ही मराठी गझलेची पुस्तके प्रकाशित आहेत. “फूलों के खंजर” हा हिंदी व उर्दू गझल संग्रह प्रकाशित आहे. डॉ. राम पंडित संपादित मराठी गझल हा ग्रंथ, ‘घर वाऱ्याचे पाय पाऱ्याचे’ हा ललित संग्रह, ‘कथा नसलेल्या कथा’ हा कथासंग्रह, ‘बच्चा लोग ताली बजाव’ हा विनोदी लेखसंग्रह, ‘शायरी नुसतीच नाही’ हा उर्दू शायर व शायरीचा परिचय ग्रंथ, कुळ कायद्यातील घरठाण हक्क बाबत ‘राहील त्यांचे घर’ हा ग्रंथ व दैनिक सकाळ मध्ये त्यांच्या पाचशे बोधकथा प्रकाशित झाल्या त्याचे सवाशे बोधकथांचे एकूण चार खंड प्रकाशित केले आहेत. गझल व गझलावर व अन्य विषयावर महाराष्ट्राभर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत.
आकाशवाणी, दूरदर्शनवर गझल व गद्य साहित्य प्रसारित झाले आहे. उर्दू भाषा व लिपी शिकून त्यांनी उर्दू भाषेत ‘रिंद’ या नावाने गझल लेखन केले आहे. ‘शब्द झाले सप्तरंगी’, ‘रेगिस्तान से हिंदोस्तान’ तसेच ‘गालिब और में’ या कार्यक्रमातून गझल सादरीकरण केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदचे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मानाने त्यांनी निवड झाली होती. २०२३ साली अकोला येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकाचे ते मुख्य संपादक असताना महत्वाची तेरा पुस्तके प्रकाशित केली.
त्यांचे शिक्षण बी.एस.सी.,बी. एड., एल.एल.बी., एल. एल.एम., एम. बी. ए. व पीचडी झालेले आहेत. सुरुवातीला उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी नौकरीत रूजू झाले. नंतर सहाय्यक आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग व सामान्य प्रशासन, ठाणे महापालिका उपआयुक्त, सांस्कृतिक उपसचिव, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महासंचालक माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मृदू व जलसंधारण खात्याचे सचिव, विभागीय आयुक्त अमरावती येथून ते निवृत्त झाले. आता ते महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून नियोजित दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाईच्या संमेलनाध्यक्षपदी निवड केली आहे अशीही माहिती स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी दिली.
बैठकीस स्वागत समितीचे कार्याध्यक्ष डॉ . शुभदा लोहिया, सचिव गोरख शेंद्रे, कोषाध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष निशा चौसाळकर, डॉ. शैलजा बरुरे, सहसचिव अभिजीत जोंधळे, संतोष मोहिते, तिलोत्तमा पतकराव आदी सदस्य उपस्थित होते. अंबाजोगाईच्या साधना सेवाभावी संस्थेने हे संमेलन घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रसिक, गझलकार व अंबाजोगाईकर यांच्या संयुक्त आर्थिक सहकार्यातून हे संमेलन घेण्यात येत आहे. हे संमेलन फेब्रुवारी महिन्यात १ व २ तारखेला योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नागापूरकर सभागृहात संपन्न होणार आहे. या संमेलनाची तयारी सुरू असून. महाराष्ट्र व बाहेर राज्यातून ३०० गझलकार सहभागी होणार आहेत. पाहिले संमेलन अमळनेर येथे पार पडले होते. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गझलकार व अभ्यासक शिवाजी जवरे हे होते.