आ. अमोल जावळे ‘किंगमेकर’ ! : रावेर, फैजपुरात सत्ता तर यावलला सर्वाधीक नगरसेवक !


फैजपूर, ता. यावल-जितेंद्र कुलकर्णी । आज लागलेल्या निकालात रावेर आणि फैजपुरमध्ये भाजपने नगराध्यक्षपदांसह सत्ता संपादन केली असून यावलमध्ये सर्वाधीक नगरसेवक निवडून आले असून या माध्यमातून आ. अमोल जावळे यांनी आपले मतदारसंघावरील वर्चस्व दाखवून दिले आहे. अमोल जावळे हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठी निवडणूक असल्याने नगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच या मतदारसंघात यावल, रावेर आणि फैजपूर या तीन नगरपालिका असल्याने यातील निकाल हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे होते. या अनुषंगाने आ. अमोल जावळे यांनी यंदा तिकिटे देतांनाच नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले. यामुळे जुने काही प्रमाणात दुखावले गेले तरी त्यांची समजूत काढण्यात आली. आणि यामुळे रावेर येथे सहज विजय मिळाला. येथे पक्षाचे नगरसेवक देखील बहुसंख्येने निवडून आले आहेत. गेल्या नगरपालिकेत येथे भाजपचा पराभव झाला होता. यामुळे रावेर येथील विजय हा भाजपचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. दुसरीकडे फैजपूर येथे प्राधान्याने तरूणाईला प्राधान्य देण्यात आले. आणि नगराध्यक्षपदासाठी दामिनी पवन सराफ यांना संधी देण्यात आली. निवडणुकीआधीच काँग्रेसचे उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपचा मार्ग मोकळा केला. यानंतर दामिनी सराफ यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला. आणि आज जनतेने त्यांना कौल देत नगराध्यक्षपदी विराजमान केले. यावल येथे पक्षाने अचूक रणनितीचा अवलंब केला होता. यासाठी जळगावहून अरविंद देशमुख यांना पाठविण्यात आले. मात्र काही बाबी अपूर्ण झाल्याने येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. तथापि, येथून भारतीय जनता पक्षाचे सर्वाधीक आठ नगरसेवक निवडून आल्याची बाब लक्षणीय ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणात येथे पक्षाचे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेत. यासाठी आ. अमोल जावळे यांचे नेतृत्व हे निवडणुकीत चमकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष करून आ. अमोल जावळे यांनी आपल्या सोबत तरूण सहकाऱ्यांची नवीन पिढी तयार करण्यास प्रारंभ केल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.