यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत अचानक चक्कर येऊन पडल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून तात्काळ आश्रमशाळेला भेट देऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व शाळा प्रशासनाला काही सुचना दिल्या आहे.
या संदर्भातील माहिती अशी की यावल तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता तिसरी वर्गात शिकणाऱ्या ९ वर्षीय फुलसिंग पहाडसिंग बारेला (रा. विटवे पाडा हिंगोणा ता. यावल) या विद्यार्थ्यास आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळेत अचानक चक्कर येउन पडला. त्यास शाळा प्रशासनाच्या वतीने तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. प्रशांत जावळे यांनी त्या विद्यार्थ्याची तपासणी करीत त्यास मृत घोषीत केले. सदर घटनेची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने तात्काळ घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यावर त्यांनी यावलचे ग्रामीण रुग्णालय गाठले.
यावेळी रूग्णालयात उपस्थित मनसेचे संजय नन्नवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुगल पाटील व त्यांच्या सहकार्यानी सदरच्या मरण पावलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यु हा निष्काळजीपणामुळे झाल्याचे आरोप लावले असून यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अरूण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी परिस्थितीची जाणीव ठेवुन तात्काळ सखोल सविस्तर चौकशी करण्यात येईल असे संबधींना आश्वासित केले. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता मयत मुलाचा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी असे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु तडवी यांच्या पथकाने मनवेलच्या शाळेत जाऊन संपुर्ण विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी प्रकल्प अधिकारी अरूण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग पवन पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांच्या दैंनदिन शाळेत शिक्षण घेताना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या व आश्रमशाळेच्या प्रशासनाने या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे सुचित केले आहे.