चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर व चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला. मात्र, चंद्रपूर दीक्षाभूमी अविकसित आहे. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी सोयीसुविधा नाहीत. परिणामी येथे गैरसोय होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्या हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटींचा निधी देण्याची मागणी केली होती.
दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. मागणीची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती. राज्य शासनाने निधी मंजूर केल्याने ऐतिहासिक दीक्षाभूमीचा कायापालट होणार आहे.
शासनाने यासाठी निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून ६५ फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे, सुरक्षा भिंत, बुद्धविहार, परिसर सौंदर्गीकरण, वाहनतळ व्यवस्था, सभामंडप यासह इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत.