पबजी खेळताना १६ वर्षीय मुलाचा पंप हाऊसच्या खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पबजी गेममुळे पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पबजी गेम खेळता खेळता 16 वर्षांचा मुलगा पंप हाऊसच्या खड्ड्यामध्ये पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. अंधारामध्ये अंबाझरी तलावाच्या काठावर मित्रासोबत पबजी गेम खेळत असताना या मुलाचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या मुलाचे नाव पुलकीत शहदादपुरी असे आहे. पुलकीतने बुधवारीच (12 जून) आपला वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ही घटना घडली.

मध्यरात्री 12 वाजता त्याने केक कापला आणि पहाटेच्या सुमारास तो मित्रासोबत गेम खेळण्यासाठी अंबाझरी तलावाच्या काठावर गेला. येथे दोघंही पंप हाऊसजवळ बसून मोबाइलवर गेम खेळत होते. येथे जवळच पंप हाऊसचा 100 फुटांपेक्षाही खोल खड्डा आहे. याच खड्ड्यात पडून पुलकीतचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Protected Content