ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाण्यातील भोईवाडा परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या अवस्थेत असताना घराच्या छतावरून सिलिंग प्लास्टरचा तुकडा पडून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, किशन पटेल असे मृत मुलाचे नाव आहे. तो आई वडिल, भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. पटेल यांचे कुटुंब चार मजसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत राहत होता. रात्री झोपेत असताना अचानक त्याच्या अंगावर प्लास्टरचा तुकडा पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलाच्या आईची चौकशी केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुलगा खोलीत झोपला होता. तेव्हा अचानक त्याच्या अंगावर प्लास्टरचा तुकडा पडला आणि तो ढिगाऱ्याखाली अडकला. हा प्रकार पाहून घरातील कुटुंबियांनी धाव घेतले. शेजारच्यांच्या मदतीने मुलाला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पटेल यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.