अमळनेर प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यासोबत अमळनेर ते मुंबई दीड तासांचा प्रवास करतांना अमळनेर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने गृहमंत्र्यांनी आमदारांच्या या मागणीस हिरवा कंदील देऊन पोलीस महासंचालकाकडून माहिती मागविली असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली.
गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी अमळनेर दौरा आटोपून हेलिकॉप्टर ने मुंबई परतताना आपल्या सोबत आ अनिल पाटील यांना सोबत घेतले होते, प्रवासात गृहमंत्र्यासह त्यांचा असिस्टंट व आमदार पाटील हे तीनच जण असल्याने आमदारांनी ही एकांतवासाची संधी साधून अमळनेर शहराचा वाढता विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि नागरिक व व्यापाऱ्यांची सुरक्षा आदी मुद्दे उपस्थित करून अमळनेर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी केली व याबाबत सविस्तर अहवाल व मागणीपत्र देखील दिले, आणि विशेष म्हणजे अमळनेर येथे पोलीस कॉलनीच्या जागेतच पोलीस ठाण्याची निर्मिती व्हावी व याठिकाणी काही निवासस्थाने देखील व्हावेत अशी मागणी आमदारांनी केली.
यासोबतच सध्याच्या पोलीस ठाण्यात कमी असलेले कर्मचारी संख्याबळ व कमी असलेले अधिकारी याकडे देखील गृहमंत्र्यांचे लक्ष त्यांनी वेधले. तसेच आताचे पोलीस ठाणे शहरापासून तीन किमी अंतरावर असल्याने यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची कशी कसरत होते हे प्रामुख्याने गृहमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्याने गृहमंत्र्यांनी देखील लवकरच आपले शासन अमळनेर शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीची आपली इच्छा पूर्ण करेल असा शब्द आमदारांना देऊन लागलीच त्यांच्या पी एस ला सूचना करून पोलीस महासंचालक कार्यालयात सविस्तर माहिती सादर करण्याचा सूचना देखील दिल्याची माहिती आ पाटील यांनी दिली.
पातोंडा पोलीस दुरक्षेत्र इमारत व चोपडाई दुरक्षेत्र निर्मितीची मागणी- पातोंडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दुरक्षेत्र असताना तेथील खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नूतनीकरणाची मागणी होत आहे, तरी याठिकाणी नवीन वास्तू मंजूर करावी आणि चोपडाई कोंडावळ येथे दोन जिल्ह्यांची सीमा असल्याने येथून अनेक गुन्हेगार आणि अवैध बाबींचा प्रवेश होत असतो तरी याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस दुरक्षेत्र निर्माण करून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी आ पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केल्याने या मागणीला देखील त्यांनी हिरवा कंदील दिला.