वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत मतमोजणी सुरू असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार राज्यांमध्ये आघाडीवर आहेत.
या राज्यातही चुरशीची लढाई सुरू आहे. ही चारही राज्ये ट्रम्प यांनी जिंकली तरी २७० या मॅजिक फिगरपासून ते दूर असणार असल्याचे चित्र आहे. सध्या, पेन्सिलवेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरिलोना, अलास्का, नेवदा आदी राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. यापैकी बहुतांशी राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत.
पेन्सिलवेनिया या राज्यातील मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. पेन्सिलवेनिया राज्यात २० इलेक्टोरल मते आहेत. पेन्सिलवेनियाच्या मतमोजणीत हेराफेरी होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. पेन्सिलवेनिया आम्ही जिंकलो असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असला तरी अद्यापही मेल-इन मतांची मोजणी बाकी असल्याचे पेन्सिलवेनियाच्या राज्यपालांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांना पेन्सिलवेनियासह (२० मते) जॉर्जिया (१६ मते), नॉर्थ कॅरिलोना (१५), अलास्का (३ मते) या राज्यांमध्ये आघाडी आहे. सध्या ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. या राज्यात ट्रम्प विजयी झाले तरी त्यांना २६८ मते मिळतील. दुसरीकडे जो बायडन यांना २६४ मते आहेत. त्यांना २७० हा जादूई आकडा गाठण्यासाठी फक्त सहा मतांची आवश्यकता आहे. नेवादा या राज्यात बायडन आघाडीवर आहेत. या राज्यात सहा इलेक्टोरल मते आहेत.
डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन राज्यात विजय मिळवला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये एकूण २६ इलेक्टोरल मते आहेत. मात्र, या राज्यातील मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. या राज्यांमध्ये आपण आघाडीवर होतो. मात्र, अचानक पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या राज्यातील निकालांना डोनाल्ड ट्रम्प कोर्टात आव्हान देणार आहेत.