‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व शाळा बाह्य मुलींचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक असून त्यासाठी आवश्यक  त्या उपाययोजना आखाव्यात. मुलींना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विशेषत: आदिवासी भागातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुन त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिलांना व मुलींना एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, मनोधैर्य योजना, सुकन्या समृध्दी योजना, मातृत्व वंदन योजनांचा लाभाबरोबरच इतर योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

तसेच महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी 181 या क्रमांकांवर संपर्क साधावा. सन 2011 च्या जनगणनेनुसार सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी 914 तर राज्याचा दर 894 इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर 920 इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत सांगितले.

 

Protected Content