जळगाव प्रतिनिधी । दुग्धव्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकऱ्याला १९ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पदार्फाश केला असून मुंबई येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. याआधी दिल्लीच्या दोन जणांना अटक झाली होती.
या टोळीकडून ४ लाख ९० हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अली मोहम्मद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (रा.लोकमान्य नगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा.मुलुंड, मुंबई) यांच्यासह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.या संशयितांकडून चार एटीएम कार्ड व ४ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप विठ्ठल महाजन (४६, रा.पिंपळगाव, हरेश्वर, ता.पाचोरा) या शेतकऱ्याला दुग्धव्यवसाय सुरु करावयाचा असल्याने त्यांनी ७५ लाखाचे कर्ज काढण्यासाठी पाचोरा येथील एका बँकेशी संपर्क साधला होता, मात्र शाखा व्यवस्थापकाने इतकी रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महाजन यांना बजाज फायनान्सच्या मुंबई कायार्लयातून व्यवस्थापक कबीर अग्रवाल बोलत असल्याचे सांगून एकाने मोबाईलवर संपर्क साधला. तुम्हाला कजर् मिळेल, मात्र त्याबदल्यात ४ लाखाची विमा पॉलीसी काढावी लागले त्याचे सर्व फायदे मिळतील तसेच ४० लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, असे सांगून चार वेळा चार बँकामध्ये १२ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावले. त्यानंतर मुंबई बोलावून ६ लाख रुपये घेतले. महाजन यांनी एकूण १८ लाख ४९ हजार रुपये या टोळीकडे भरले. इतकी रक्कम दिल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, अरविंद वानखेडे व श्रीकांत चव्हाण यांचे पथक दिल्ली रवाना केले होते. या पथकाने दोन दिवस सापळा रचला व सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोघांना तेथून अटक केली. याकामात सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांची मेहनत कामात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती, मात्र नंतर लॉकडाऊनमुळे दिल्ली जाणे शक्य झाले नाही. आता परत पथकाने चौकशी केली असता मुंबईतून काही कॉल झाल्याचे लक्षात आल्याने उपनिरीक्षक अंगद नेमाणे, गौरव पाटील व ललीत नारखेडे यांनी मुंबई गाठली. तेथून रविवारी अली मोहम्मद मुमताज ,अविनाश हनुमंत वांगडे व रविराज शंकर डांगे या तिघांना अटक करण्यात आली.