भाजपचा राजीनामा दिलेला नाही : एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन

जळगाव प्रतिनिधी । आपण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

याबाबत वृत्त असे की माजी मंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे ही पक्षांतर करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. तथापि खुद्द एकनाथराव खडसे यांनी याबाबत मात्र आजवर चुप्पी साधलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सरकारनामा या पोर्टलने एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त दिल्याने एकच खळबळ उडाली. यासंदर्भात लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना एकनाथराव खडसे यांनी या बातम्यांनी आपले स्वतःचे खूप मनोरंजन होत असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. यानंतर एएनआय या देश पातळीवरील ख्यातनाम वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी आपण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबतचा सस्पेन्स शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. 

 

 

Protected Content