चेन्नई (वृत्तसंस्था) राफेल आणि देसॉल्टच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचे नाव आले आहे. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे मोदी असोत की वढेरा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमोर केली. यानिमित्ताने राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
यावेळी राहुल गांधी पुढे म्हणाले की, रॉबर्ट वढेरा यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची आहे. तुमच्याकडे सर्व साधनेही आहेत. रॉबर्ट वढेरा तपासात सहकार्यही करत आहेत. पण कधी पंतप्रधान स्वत: राफेलवर एकतरी शब्द बोलले आहेत का? पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदींनी राफेल करारात काय केले आहे. तरीही त्यांनी मौन बाळगले आहे. रॉबर्ट वढेरा यांची चौकशी केली जात आहे. ते तपासात सहकार्य करत आहेत. परंतु मोदींचे नाव राफेलच्या कागदपत्रात आहेत. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. यावर मोदींनी मौन बाळगले आहे.
मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, ते देशात भीतीचे वातावरण निर्माण करून देशाच्या आर्थिक प्रगतीवर चर्चा करू इच्छित नाहीत. आम्हाला देशाचा मूड बदलायचा आहे. कारण या देशाचा कल आर्थिक प्रगती करण्याकडे आहे. तुम्ही किती वेळा पंतप्रधान अशा पद्धतीने ३००० महिलांसमोर बोलताना पाहिले आहे? असा सवाल त्यांनी केला. ते अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे कधी दिसलेत का, असेही राहुल म्हणाले.